सोनपेठ : तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात ९ कोटी ४ लाख ४ हजार ६३० रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे हा निधी केव्हा मिळणार याकडे लाभार्थी शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यावर्षी जून महिन्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी वेळेवर झाली. आवश्यकतेनुसार पाऊस होत गेल्याने सप्टेंबर महिन्यापर्यंत पिके बहरली होती. मात्र त्यानंतर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन व कापूस हातचे गेले. झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्य शासनाने ८ कोटी ५९ लाख ४२ हजारांचा निधी तहसील प्रशासनाकडे वर्ग केला. त्यानंतर प्राप्त झालेला निधी तहसील कार्यालयाने बँकांकडे वर्ग करून २६ गावांतील १३ हजार ३५० शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला. आता उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील २६ गावांसाठी ९ कोटी ४ लाख ४ हजार ६३० रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे हे अनुदान कधी मिळणार, असा प्रश्न सोनपेठ तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
या गावांतील शेतकऱ्यांना मिळाले अनुदान
पहिल्या टप्प्यात तालुक्यातील सोनपेठ, सोनखेड, सायखेड, शेळगाव हटकर, शेळगाव मराठा, शिरसी बुद्रूक, शिरोरी, वैतागवाडी, विटा, वाणीसंगम, वाडी पिंपळगाव, वाडी नैकोटा, वाघलगाव, वडगाव, वंदन, लोहिग्राम, लासिना, मोहळा, मरगळवाडी, भिसेगाव, बोंदरगाव, पारधवाडी, नैकोटा, निळा, निमगाव, नरवाडी या २६ गावांतील १३ हजार ३५० शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ८ कोटी ५९ लाख ४२ हजारांचे अनुदान वाटप करण्यात आले.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी तालुक्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेली रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मिळताच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येईल.
ऐश्वर्या गिरी, तहसीलदार, सोनपेठ