चुडावा (जि. परभणी) : कर्जमाफ करुन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, त्याचबरोबर दुष्काळी अनुदान तत्काळ बॅक खात्यावर वर्ग करावे, यासह विविध मागण्यांसाठी पूर्णा तालुक्यातील ११ गावातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी पूर्णा- नांदेड या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. त्यानंतर तहसील प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
२०२२-२३ या वर्षातील पिक विमा तात्काळ देण्यात यावा, वंचित शेतकऱ्यांच्या दुष्काळाचे अनुदान तत्काळ बँक खात्यावर वर्ग करावे, महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत मिळणारे प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांच्या अनुदान लाभार्थ्यांना तत्काळ देण्यात यावे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, ६० वर्षांच्या शेतकऱ्यांना महिना १० हजार रुपये पेन्शन लागू करावे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड करण्याचा प्रकार करणाऱ्या बँका प्रशासनावर कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी पूर्णा तालुक्यातील चुडावा, पांढरी, धोतरा, बरबडी यासह ११ गावातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी पूर्णा- नांदेड या महामार्गावर चुडावा येथे रास्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनामुळे या महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर तहसीलदार मस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेतले. त्यानंतर त्यांना आश्वासन देऊन हे आंदोलन मागे घेण्याचे विनंती केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाला सादर केले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात प्रेम देसाई, नामदेव देसाई, लक्ष्मण देसाई, अंकुश देसाई, वेंकटी हातागळे, केशव देसाई, गुणाजी कच्चे, भगवान देसाई, प्रल्हाद देसाई, लिंबाजी शेळके, संजय देसाई यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.