परभणी : निर्यातक्षम कृषी उत्पादनासाठी शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, तरच भरघोस उत्पादन घेणे शक्य आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील तज्ज्ञ मार्गदर्शक, वित्तीय सल्लागार दिलीप देशमुख यांनी केले.
परभणी येथील सक्सेस कॉटन इंडस्ट्रीज व श्री शिवाजी कॉलेज माजी विद्यार्थी प्रतिष्ठान, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतमाल विक्री व्यवस्थापन आणि त्यामधील व्यवसायाच्या संधी’ या विषयावर नुकतेच व्याख्यान पार पडले. याप्रसंगी देशमुख बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर, वाई-सातारा येथील दीपज्योती फाउंडेशनच्या दीपाताई घाटगे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, सक्सेस कॉटन इंडस्ट्रीजचे संचालक मुरलीधर डाके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांनी व शेतकरी उत्पादक कंपन्यानी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी एकत्र येऊन पिकांचे भरघोस उत्पादन घ्यावे. उत्पन्नासह शेतीमालाचा उच्च दर्जा राखावा. बाजारपेठेचा अभ्यास करताना शेतीमालाचे चांगल्या प्रकारे मार्केटिंग करून अधिक नफा कसा मिळवता येईल, याकडे लक्ष द्यावे. पारंपरिक शिक्षण कालबाह्य झाले असून, सद्य:स्थितीत ६२२ व्यवसायांमध्ये करिअर करता येऊ शकते. चांगल्या शिक्षणाबरोबरच चांगले संस्कारही महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर म्हणाले, पीक पद्धतीत जोपर्यंत बदल केला जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही. शेतकऱ्यांनी जे विकतं ते पिकवून गुणात्मक बदल करीत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. रामप्रसाद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी सविता डाके, श्री शिवाजी कॉलेज माजी विद्यार्थी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या मालेवार, सचिव अण्णासाहेब सोनवणे, प्रा. अशोक राख, विलास जैन, पंकज पाटील, अनंत डुकरे, सुरेश हिवाळे, प्रसाद लेंगुळे, शिवराम खेडूळकर, महेश खाकरे आदींनी प्रयत्न केले.
उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश डागा, उदय कत्रुवार, नारायण धस, मेघाताई देशमुख, गोविंद अजमेरा, नितीन लोहट, ॲड. अशोक सोनी, अशोक राख आदींचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या दीपाताई घाटगे यांनी सातारा जिल्ह्यात २००३ पासून करत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील ६५० बचत गट त्यांनी तयार केले असून, ९५० प्रकारचे विविध व्यवसाय प्रशिक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितले.