जिंतूर(परभणी ) : ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तालुक्यातील येसेगाव येथे एक शेतकरी वाहून गेल्याची घटना काल संध्याकाळी घडली. इंदर चिमाजी शेळके (५०) असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांचा अद्याप शोध लागला नाही.
तालुक्यात काल दुपारी १ वाजेपासून जोरदार पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील अनेक भागात पाणी साचले होते. सायंकाळी येसेगाव येथील शेतकरी इंदर चिमाजी शेळके हे नेहमी प्रमाणे शेतातील कामे करून घराकडे निघाले. यावेळी गावाजवळील ओढ्याला पूर आला होता. यातून रस्ता काढत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. यातच ते प्रवाहासोबत वाहून गेले. शेळके यांना सापडण्यासाठी गावकरी, शेतकरी व पोलीस यांची शोध मोहीम सुरु केली आहे.