परभणी : पंधरा दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने सध्या शेतकऱ्यांचा घोर वाढविला आहे. आतापर्यंत झालेल्या दमदार पावसाच्या भरवशावर तरारून आलेली पिके आता मात्र पावसाचा ताण सहन होत नसल्याने माना टाकत आहेत. कुठे पिके पिवळी पडत आहेत तर कुठे मावा-तुडतुड्याच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल झाला आहे. नजरेत जीव ओतून आकाशाकडे पाहत शेतकऱ्यांना आता पावसाची आस लागली आहे.
मागच्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस होत आहे. मात्र, तो वेळेला होत नाही. मागील वर्षी खरिपाची पिके हाता-तोंडाशी असताना झालेल्या अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले होते. हे नुकसान पचवून यावर्षी शेतकरी पेरणीसाठी उभा राहिला. जून महिन्यातच दमदार पाऊस झाल्याने वेळेवर पेरण्या झाल्या. पहिल्या दोन महिन्यांत चांगला पाऊस झाल्याने सध्या पिके तरारलेली आहेत. सोयाबीन, कापसाची वाढ समाधानकारक असून, पहिल्या टप्प्यात पेरणी झालेली पिके सध्या फुलोऱ्यात आहेत. अशा परिस्थितीत पिकांकडून पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र, दुसरीकडे पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. पुरेसे पाणी न मिळाल्याने पिके माना टाकत आहेत. काही भागात पिके पिवळी पडू लागली असून, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
किडींच्या प्रादुर्भावाचे दुसरे संकट
वातावरणात झालेला बदल किडींसाठी पोषक असतो. त्यातच जमिनीतील पाणी कमी झाल्याने कीड वाढते. त्यामुळे सोयाबीन पिकात चक्री भुंगा, कापसावर मावा, तुडतुडे तसेच सोयाबीन, तूर, मूग या पिकांवर पाणे गुंडाळणाऱ्या तसेच रस शोषण करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे.
हा उपाय करा, ८ दिवस पिके तग धरतील
पिकांना पाण्याचा ताण पडत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी १३:०.:४५ या पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. १०० ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट १० मिली पाण्यात मिसळून फवारणी केल्यास पिकांच्या मुळाजवळील पाण्याचे बाष्मीभवन कमी होईल. ज्यांची पिके ५५ दिवसांपेक्षा अधिक दिवसांची आहेत त्यांनी २०० ग्रॅम पोटॅशिम नायट्रेट १० मिली पाण्यात मिसळून फवारावे. शक्यतो सकाळच्या वेळेस फवारणी करावी.
शेतात पिकांजवळ उगवलेले तण काढून घ्यावे. त्यामुळे पिकांची पाण्याची गरज भागेल. पाणी उपलब्ध असल्यास संरक्षित पाणी पाळी द्यावी. फवारणी केल्याने पिके किमान ८ दिवस तग धरतील, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता डॉ.गजानन गडदे यांनी सांगितले.
१३ ते २० ऑगस्टदरम्यान होईल पाऊस
मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन ६ मिली प्रतिदिवस एवढे होत आहे. हे प्रमाण आपल्याकडे अधिक आहे. १३ ते२० ऑगस्ट यादरम्यान हलका पाऊस होईल. सध्याची पिकांची स्थिती पाहता, ४ मिमी एवढा कमी पाऊस झाला तरी तो पिकांसाठी पोषक ठरू शकतो. १३ ऑगस्टपासून हलका पाऊस होण्याची शक्यता आहे, असे हवामान तज्ज्ञ डॉ.के.के. डाखोरे यांनी सांगितले.