पाथरी : शेत धुऱ्यावर उगवलेले चंदन शेतीकामासाठी १२०० रुपयांना विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना चंदन चोर ठरवून त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये पाथरी पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके यांनी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत जैतापूरवाडी येथील शेतकऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली आहे.
पाथरी तालुक्यातील जैतापूरवाडी येथील शेत गट नं. १४६ मध्ये किशन लक्ष्मण यादव यांची शेती आहे. त्यांच्या शेतातील नाल्याच्या बाजूने धुऱ्यावर चंदनाचे नैसर्गिकरीत्या उगवलेले झाड आहे. २३ नोव्हेंबर रोजी त्यांच्या शेतात चंदन तोडणारे काही इसम आले होते. शेतीसाठी खत आणण्यासाठी किशन यादव यांनी चंदनाची दोन झाडे अनोळखी इसमाला १२०० रुपयांना विक्री केले. झाड तोडणे झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी चंदन घेणारे अनोळखी दोघे जण घटनास्थळापासून पसार झाले. मात्र, या पोलीस अधिकाऱ्यांनी शेतमालक किशन यादव आणि शेतात काम करणारे उमेश खुणे या दोघांना ताब्यात घेेतले. त्यानंतर तुमच्याविरुद्ध चंदन चोरीचा गुन्हा दाखल करतो म्हणून पाच तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. त्यानंतर तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायचा नसेल तर मुंजाभाई टाकळकर यांच्या मध्यस्थीने १ लाख २० हजार रुपये घेतले. विशेष बाब म्हणजे हे शेतकरी गरीब कुटुंबातील असल्याने गावातील इतर ग्रामस्थांनी ही रक्कम जमा करून दिली. त्यानंतर आता गावात चर्चा झाली असल्याने या शेतकऱ्यांकडून फिर्याद लिहून घेत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत किशन लक्ष्मण यादव, उमेश खुणे या शेतकऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांची ४ डिसेंबर रोजी भेट घेऊन या प्रकरणाची लेखी तक्रार दिली आहे. त्यामुळे लाचखोर फौजदाराची अनेक प्रकरणे उघडकीस येऊ लागली आहेत.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके यांना यापूर्वीच एका प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. मात्र, पाथरी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना कोरके यांनी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरल्याच्या अनेक तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल होत असल्याने कोरके यांचे प्रताप उघड होऊ लागले आहेत.