कोरोनाच्या संकट काळात आणि अवकाळी पाऊस होत असतानाही पणन महासंघाच्या सूचनेवरून जीव धोक्यात घालून जिनिंग- प्रेसिंग चालकांनी जिल्ह्यातील कापूस खरेदी केला. मात्र, पणन महासंघाकडून निर्धारित वेळेत कापूस गाठी व सरकी उचलली नाही. सरकीची नियमानुसार बॅगिंग करण्यात आली नाही. सरकी विक्री करण्यास व गाठी उचलण्यास भरपूर कालावधी लागला. त्यामुळे पणन महासंघाच्या नियोजनाअभावी नुकसान झाले असताना पणन महासंघाने मात्र जिनिंग- प्रेसिंग चालकांना जबाबदार धरून कोट्यवधी रुपयांच्या वसुलीच्या नोटीस पाठविल्या आहेत. ही कारवाई बेकायदेशीर असून, या नोटीस रद्द कराव्यात, अशी मागणी परभणी जिल्हा जिनिंग- प्रेसिंग असोसिएशनने केली आहे. याच प्रश्नावर गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश डागा, रामेश्वर राठी, प्रेमकुमार डागा, मुरलीधर डाके, अनिल अग्रवाल, राहुल मुरकुटे, रामनिवास शर्मा, दीपक अंबिलवादे, मनोज झंवर, गिरीश मुक्कावार यांच्यासह जिनिंग- प्रेसिंग असोसिएशनचे व्यापारी या आंदोलनात बहुसंख्येने सहभागी झाले होते.
चुकीची नोटीस रद्द करण्यासाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:43 AM