परभणी : पालम तालुक्यातील शिरपूर ते सायाळा या रस्त्यावरील गळाटी नदीपात्रावर पुलाचे नियोजन आहे. याचे कंत्राट निघून काम सुरु हि झाले होते. मात्र, मागील २ वर्षांपासून हे काम ठप्प आहे. हे काम पुन्हा सुरु करावे या मागणीसाठी सायाळा, शिरपूर, उमरथडी, रावराजूर, धनेवाडी, खुर्लेवाडी येथील ग्रामस्थांनी आज सकाळपासून नदीपात्रातमध्ये उतरून उपोषण सुरु केले आहे.
गळाटी नदीपात्रात शिरपूर जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने नाबार्ड अंतर्गत ७२ लाख रुपयांच्या पुलाच्या कामास मंजुरी दिली आहे. यानुसार शिरपूर ते सायाळा या रस्त्यावरील या पुलाच्या कामाचे कंत्राट मंजूर झाले. परंतु, कंत्राटदाराने पुलाचे काम सुरु करून नंतर ते अर्ध्यावरच सोडले आहे.
मागील दोन वर्षांपासून हे काम रखडले आहे. याबद्दल नागरिकांनी वारंवार तक्रार करुनही कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करुन कारवाई करावी. तसेच रखडलेले काम तत्काळ सुरु करावे, या मागणीसाठी सायाळा, शिरपूर, उमरथडी, रावराजूर, धनेवाडी, खुर्लेवाडी येथील ग्रामस्थांनी आज सकाळी १० वाजेपासून नदीपात्रात उपोषण सुरु केले आहे.दुपारपर्यंत उपनिरीक्षक प्रसेनजीत जाधव वगळता एकही अधिकारी या उपोषणाकडे फिरकला नव्हता. या उपोषणामध्ये उपसभापती रत्नाकर शिंदे, सरपंच आत्मारा चौरे, नारायण दुधाटे, बळीराम चौरे, शादुल सय्यद, मंजूर खान पठाण, बालाजी भंडारे, प्रकाश चौरे, गणेश चौरे, जफर खान पठाण, अंकुश आव्हाड आदी ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.