देवगावफाटा : वडिल मोबाईल घेऊन देत नसल्याचा राग मनात धरुन एका युवकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना सेलू तालुक्यातील निरवाडी खु. तांडा येथील २७ एप्रिल घडली होती. या प्रकरणी वडिलांच्या जवाबानंतर ६ मे रोजी आत्महत्येचे कारण पुढे आले आहे.
निरवाडी खु. तांडा येथील कृष्णा गोविंदराव आडे (२०) या युवकाने २७ एप्रिल रोजी चिकलठाणा खु. येथील सखाराम टाके यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. निरवाडी खु. तांडा येथील गोविंदराव आडे हे अल्पभूधारक शेतकरी असून शेत जमिनीवरच कुटुंबिय उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी अशी अपत्य आहेत.
मुलीचे लग्न करुन दिल्याने गोविंदराव आडे यांची आर्थिक अडचण सुरु होती. त्यांना शेतीकामात मदत करणारा मुलगा कृष्णा आडे याने आत्महत्या केल्यापासून तर या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ६ मे रोजी वालूर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबराव चौरे यांनी कृष्णा याच्या आत्महत्येप्रकरणी कुटुंबातील सदस्यांचे जवाब नोंदवून घेतले. यावेळी त्याचे वडिल गोविंदराव आडे यांनी सांगितले, अॅन्ड्रॉँईड मोबाईल घेऊन देण्याची मागणी कृष्णाने वारंवार केली होती. परिस्थितीमुळे त्याला मोबाईल घेऊन देणे शक्य नसल्याने थोडेसे थांबण्याची विनंती केली. मात्र कृष्णाचा हट्ट जीवावर बेतेल, असे वाटले नव्हते. मोबाईल न दिल्याचा राग मनात धरुन कृष्णाने आत्महत्येचा पर्याय निवडला, असा जवाब त्याचे वडिल गोविंदराव आडे यांनी पोलिसांना दिला आहे.आई- वडिल हे मुलांच्या सुखासाठी सर्वकाही करीत असतात. मात्र मुलांच्या मनाविरुद्ध पालकांनी वागू नये, असा आजचा ट्रेंड झाला आहे. त्यामुळे मुलांचे अनावश्यक हट्ट असतील तर पालकांनी याबाबत अगोदरच मुलांचे समुपदेशन केले पाहिजे. जेणेकरुन मुलाने हा हट्ट सोडून दिला पाहिजे.- साहेबराव चौरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक