परभणी: जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी कृषीमंत्र्यांचा ताफा थांबवला. त्यानंतर कृषीमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदन देताच जमलेल्या शिवसैनिकांनी टपन्नास खोके, एकदम ओके' च्या घोषणा दिल्या.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर होते. परभणी शहरातील कार्यक्रम अटोपून ते पूर्णा शहराकडे मार्गस्थ झाले. त्यानंतर पूर्णेत शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी कृषीमंत्र्यांचा ताफा थांबविला. त्यानंतर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, शेतमजून, कामगारांच्या हाताला कामे द्यावीत, पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम पालम, पूर्णा व गंगाखेड तालुक्यातील सरसगट शेतकऱ्यांना लागू करावी, लम्पी आजाराने बाधित जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत करावी, यासह अनेक मागण्यांचे निवेदन कृषीमंत्र्यांकडे सुपूर्द केले.
त्यानंतर कृषीमंत्री सत्तार गाडीच्या दिशेने निघताच उपस्थित शिवसैनिकांनी पन्नास खोके, एकमद ओकेच्या घोषणा दिल्या. अचानक घोषणाबाजी सुरु झाल्याने कृषीमंत्र्यांनी तेथून काढता पाय घेतला. यावेळी जिल्हाप्रमुख विशाल कदम, दरशथ भोसले, काशिनाथ काळबांडे, मुंजाभाऊ कदम यांच्यासह २०० हून अधिक शिवसैनिक उपस्थित होते.