परभणी : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत नेत्यांमधील वैयिक्तक महत्त्वाकांक्षा अन् नातेवाइकांचाच लळा सातत्याने जिल्हावासीयांना अनुभवायास मिळत असून, बँकेवर सत्ता मिळविण्यासाठी पक्षांची वैचारिक भूमिकाही अडगळीत टाकून देण्यात आली आहे.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत बँकेचे ६ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, भाजपचे माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, बँकेचे विद्यमान अध्यक्ष पंडितराव चोखट, भाजपचे बालाजी देसाई, जि.प.सदस्य भगवानराव सानप आणि हिंगोलीचे आ. तान्हाजी मुटकुळे यांचा समावेश आहे. उर्वरित १५ जागांसाठी ३२ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. त्यातील १४ जागांवर वरपूडकर-बोर्डीकर गटात काट्याची लढत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांमधील वैयक्तिक महत्त्वाकांक्षा मतदारांना अनुभवयास मिळत असून, पक्षाच्या ज्या वैचारिक भूमिकेच्या आनाभाका आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये घेतल्या गेल्या, तो सर्व विचार जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खुजा झाला आहे. त्यामुळे अनपेक्षित आघाडी पाहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मायंदळे हे थेट बोर्डीकर यांच्या पॅनलमधून निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली असून, राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. दुसरीकडे शिवसेनेतही दोन गट कायम आहेत. एक गट उघडपणे वरपूडकर यांच्या सोबत आहे, तर दुसरा गट पडद्यामागे बोर्डीकरांना साथ देत आहे. काँग्रेस, भाजपचे नेते मात्र एकसंघ दिसून येत आहेत. दुसरीकडे या निवडणुकीत नेते मंडळींना नातेवाइकांचाच लळा असल्याचा प्रत्यय अंतिम उमेदवारांची यादी पाहिल्यानंतर येत आहे. माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कुटुंबातील चौघे निवडणूक लढवीत आहेत. त्यात स्वत: बोर्डीकर, मुलगी आ. मेघना बोर्डीकर, भावना बोर्डीकर, भाऊ गंगाधर बोर्डीकर यांचा समावेश आहे. हिंगोलीचे माजी आ. साहेबराव पाटील गोरेगावकर यांच्या कुटुंबातील तीन सदस्य निवडणूक रिंगणात आहेत. स्वत: गोरेगावकर, मुलगा राजेश पाटील आणि स्नुषा रूपाली पाटील यांचा समावेश आहे. आ. सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबातील दोन सदस्य निवडणूक लढवीत आहेत. त्यात स्वत: वरपूडकर आणि स्नुषा प्रेरणा वरपूडकर यांचा समावेश आहे. नेते मंडळींच्याच नातेवाइकांचा निवडणुकीत बोलबाला असला तरी कार्यकर्ते मात्र इमाने-इतबारे प्रचारात दंग असल्याचे दिसून येत आहेत. आता या बँकेसाठी २१ मार्च रोजी मतदान होणार असून, २३ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे दोन्ही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.