परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आ. सुरेश वरपूडकर व माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटात १४ जागांवर सरळ लढत होत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मायंदळे हे बोर्डीकर यांच्या पॅनलमध्ये गेल्याने आघाडीत बिघाडी झाल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांतील नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दोन दिवसांपूर्वी दिले होते. त्यावर शुक्रवारी चिन्ह वाटपानंतर शिक्कामोर्तब झाले. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय रामभाऊ मायंदळे यांना माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाचे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे ते बोर्डीकरांच्या गटात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात आ. वरपूडकर गटाकडून विद्यमान संचालक स्वराजसिंह परिहार निवडणूक लढवत आहेत. तर जिंतूरचे भगवानराव वटाणे हे तिसरे उमेदवार आहेत. मायंदळे यांच्या जागेवरूनच आघाडीत बिघाडी झाली आहे. या संदर्भात पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आ. वरपूडकर व माजी आ. बोर्डीकर हे दोन गट १४ जागांवर समोरासमोर लढत आहेत. वरपूडकर गटाला विमान तर बोर्डीकर गटाला कपबशी हे चिन्ह शुक्रवारी देण्यात आले. त्यामुळे या उमेदवारांचा प्रचार आता सुरू झाला आहे.
वरपूडकर गटात गोरेगावकर
हिंगोलीचे माजी आ. साहेबराव पाटील गोरेगावकर हे आ. सुरेश वरपूडकर यांच्या गटात आले आहेत. त्यांच्या गटाचे चिन्ह त्यांना मिळाले आहे. स्वत: गोरेगावकर हे सेनगावमधून तर त्यांचा मुलगा राजेश पाटील गोरेगावकर औंढ्यातून आणि स्नुषा रूपाली पाटील या महिला प्रतिनिधी गटातून निवडणूक लढवत आहेत.
पालमच्या तिन्ही उमेदवारांना वेगवेगळे चिन्ह
निवडणूक होत असलेल्या १४ पैकी १३ मतदारसंघात वरपूडकर- बोर्डीकर यांच्या गटातील उमेदवारांना अनुक्रमे विमान व कपबशी हे चिन्ह देण्यात आले आहे. पालम गटात मात्र लक्ष्मणराव दुधाटे यांना मोटारगाडी, गणेशराव रोकडे यांना छत्री आणि नारायण शिंदे यांना छताचा पंखा हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत तरी हे तिन्ही उमेदवार वरपूडकर- बोर्डीकर गटात नाहीत, हे स्पष्ट होत आहे.