१८ जानेवारी रोजी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यात फरकंडा येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल दुपारी ३ च्या सुमारास लागला होता. विजयी व पराभूत झालेले दोन्ही बाजूंचे समर्थक गावात गेल्यानंतर सार्वजनिक रस्त्यावर बाचाबाची झाली. याचे रूपांतर जोरदार भांडणात झाले होते. ऐनवेळी वीज गेल्याने लाठ्याकाठ्यानी एकमेकांशी तुंबळ हाणामारी सुरू करण्यात आली. यात दोन्ही गटातील ८ जण जखमी झाले असून, पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, उपनिरीक्षक विनोद साने, जमादार बलभीम पोले, कर्मचारी गोविंद चुडावकर हे राज्य राखीव दलाच्या तुकडीसह गावात बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष राठोड यांनी गावात ठाण मांडले आहे. परिस्थिती आटोक्यात आली असून, गावातून कोणीही फिर्याद दिली नाही. त्यामुळे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष बाबुराव आगळे यांच्या फिर्यादीवरून विजयी गटातील ४५, तर पराभूत गटातील २० अशा ६५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फरकंड्यात ग्रामपंचायत वादातून तुबंळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:18 AM