'खारघर प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा'
By मारोती जुंबडे | Published: April 24, 2023 05:50 PM2023-04-24T17:50:43+5:302023-04-24T17:56:00+5:30
खारघर प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कॉंग्रेस आमदारांची मागणी
परभणी: महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला. तर ५०० हून अधिक श्री सदस्यांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे खारघर प्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा आमदार अमरनाथ राजूरकर यांनी सोमवारी परभणी शहरात आयोजित एका पत्रकार परिषदेत केली.
खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारावर १३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यासाठी आलेल्या श्री सदस्यांसाठी कोणतेही सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही. कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनामुळे श्री सदस्यांचा मृत्यू झाला. याला सरकार जबाबदार आहे. मृतांच्या वारसांना पाच लाखांची आर्थिक मदत देऊन सरकार आपली सुटका करून घेऊ पाहत आहे. मात्र या पुरस्कार सोहळ्यात १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला. तर ५०० पेक्षा जास्त श्री सदस्य उपचार घेत आहेत.
त्यामुळे या घटनेप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधांचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्षआमदार अमरनाथ राजूरकर यांनी २४ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी काँग्रेसचे भगवानराव वाघमारे, बाळासाहेब देशमुख, रामभाऊ घाडगे, पंजाबराव देशमुख,प्रा. तुकाराम साठे, बंडू पाचलिंग, मलिका गफार, दुरार्णी खानम, अतिक उर रहेमान, सचिन अंबिलवादे, नानासाहेब राऊत, सुहास पंडित, विखार लाला, श्याम खोंवे, अमोल जाधव आदींची उपस्थिती होती.