परभणी : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांची सभा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे शहराध्यक्ष शंकर देशमुख यांच्यावर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी सभा, मोर्चे, धरणे आंदोलने, निदर्शने आदी बाबींना कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एका आदेशाद्वारे बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील महेंद्रनगर भागात तुळजाभवानी मंदिरासमोरील मैदानात ८ जानेवारी रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांची सभा घेण्यात आली होती. या सभेला जवळपास २०० ते २५० नागरिकांची उपस्थती होती. या सभेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल असे वर्तन करण्यात आले, असा अरोप करून पोलीस कर्मचारी शिवाजी विठ्ठलराव टाकरस यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून या कार्यक्रमाचे आयोजक तथा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे शहराध्यक्ष शंकर देशमुख यांच्यावर शनिवारी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
निदर्शने केल्याप्रकरणीही गुन्हा दाखलसंभाजी भिडे यांनी समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्यास त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शनिवारी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली होती. या प्रकरणीही शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात रिपब्लिकन सेनेचे आशिष वाकोडे, प्रवीण कनकुटे, विश्वजीत वाघमारे, प्रवीण गायकवाड, संजय खिल्लारे, राहुल घटसावंत व इतर २ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.