शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर रोजी रात्री १०.१० च्या सुमारास ठाण्यातील लॅडलाईनवर अज्ञात व्यक्तीने ७५०७८६९४१९ या मोबाईल क्रमांकावरून फोन केला. यावेळी पोलीस कर्मचारी माया पैठणे यांनी फोन उचलला असता समोरील व्यक्तीने हिंदीमध्ये ‘परभणी में ब्लास्ट होणे वाला है’, असे तीन वेळा सांगितले. यावेळी पैठणे यांनी तुमचा आवाज स्पष्ट ऐकू येत नसल्याचे सांगितल्यावर ‘जब ब्लास्ट होगा तब तो आवाज आयेगी’ असे म्हणून फोन कट केला. त्यानंतर पैठणे यांनी याबाबतची माहिती सहकाऱ्यांनी सांगितली. त्यानंतर पोलीस कर्मचारी मुरकुटे यांच्या मोबाईलवरून त्या नंबरवर फोन केला आणि आपण कुठून बोलता असे विचारले असता मुंबईतून बोलत आहे. त्याला परभणीत कुठे स्फोट होणार आहेत, असे प्रतिप्रश्न केल्यानंतर समोरच्या व्यक्तीने ‘तुमको पता है ना फोन पे सुना है ना’, असे म्हणत अपशब्द वापरून फोन कट केला. याबाबत पोलीस कर्मचारी माया पैठणे यांनी सोमवारी नानलपेठ पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून ७५०७८६९४१९ क्रमांकाच्या मोबाईलधारकाविरोधात पोलिसांना खोटी माहिती देऊन जनतेमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अफवा पसरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणीत स्फोटाची धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:20 AM