महावितरण कंपनीच्या वतीने सध्या जिल्हाभरात थकबाकी वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत जिंतूर येथील महावितरणचे सहायक अभियंता सचिन दत्तात्र्यय कोळपे हे ११ मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास शहरातील शिवाजी चौकात थकबाकी वसुली मोहीम राबवित होते. या भागातील अहिल्या लॉज येथे विलास लक्ष्मणराव आव्हाड यांच्या नावाने वीज जोडणी देण्यात आली होती. या लॉजकडे ४७ हजार १८० रुपयांची थकबाकी असल्याने येथील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. यावेळी कोळपे यांनी या लॉजची तपासणी केली असता येथील वीज पुरवठा सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सखोल पाहणी केली असता हा ग्राहकाने लाॅजच्या पाठीमागे असलेल्या लघुद्वार वाहिनीवर काळ्या रंगाच्या अंदाजे ३५ फूट वायरच्या साहाय्याने आकडा टाकून लाॅजमध्ये मेन स्विचला जोडून वीज पुरवठा घेतल्याचे आढळले. त्यांनी ५ हजार ३० रुपयांची २८८ युनीट वीज चोरी केल्याची बाब स्पष्ट झाली. याबाबत सहायक अभियंता सचिन कोळपे यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी विलास लक्ष्मणराव आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीजचोरीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:31 AM