सेलू (परभणी ) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र डासाळकर व उपसभापती सुंदर गाडेकर यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून या दोघां विरूद्ध नऊ संचालकांनी जिल्हाधिकार्यांकडे शुक्रवारी ( ता.१०) अविश्वास ठराव दाखल केला.
सदस्यांना विचारात न घेता मासिक सर्वसाधारण सभा घेणे, वरिष्ठांची परवानगी न घेता कामांची निविदा काढणे, वाहन विक्री करून नवीन वाहन घेण्यासाठी विनाकारण कर्ज काढणे, उत्पन्नाचा ताळमेळ न करता मंजूर खर्चापेक्षा जास्त खर्च करणे असा आरोप सभापती डासाळकर यांच्यावर केला आहे, तर गरज नसतांना कार्यालयीन कर्मचारी नियमबाह्य पद्धतीने परस्पर नियुक्त करणे, बनावट खर्चीच्या पावत्या करून लाखों रुपयांचा भ्रष्टाचार करणे, पाला हाऊसची जागा खासगी व्यक्तीस परस्पर विक्री करणे आदी आरोप उपसभापती सुंदर गाडेकर यांच्यावर अविश्वास ठरावात करण्यात आले आहेत. दोघांच्याही कार्यकाळास अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. ठरावावर बाजार समितीच्या एकूण अठरा संचालकापैकी भगवान कदम, संजय साडेगावकर, सुदाम कटारे, शितल डख, मालन हिवाळे, संतोष सोमाणी, सुरेंद्र तोष्णीवाल, कुणाल लहाने, सुनंदा पवार या नऊ संचालकांच्या सह्या आहेत.