जिंतूर (परभणी ) : वरुड नृसिंहकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुढे जाण्यासाठी जागा दिली नाही या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी चारचाकी चालकाविरोधात अट्रासिटीचा तर गळ्याला चाकू लावून लुटल्या प्रकरणी सहा इसमावर लुटमारीचा असे दोन परस्परविरोधी गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शरद सुदाम चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, सोमवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून वरुड नृसिंह कडे जात असताना रस्त्यात शासकीय गोदामाजवळ उद्योजक ब्रिजगोपाल तोष्णीवाल हे कारमधून मागून आले. पुढे जाण्यासाठी तोष्णीवाल हॉर्न वाजवत होते मात्र रस्ता खराब असल्याने त्यांना लवकर जागा देता आली नाही. यावरून त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या बाबत चव्हाण तक्रारीवरून गुरन क्रमांक 311/18 कलम 504,506 भांदवी व अजाज अप्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच घटनेत सचिन गिरधारीलाल तोष्णीवाल यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते व ब्रिजगोपाल तोष्णीवाल हे कारमधून वरुड नृसिंह कडे दूध आणण्यासाठी जात होते. रस्त्यातील शासकीय गोदमाजवळ सकाळी पावणे आठ च्या सुमारास त्यांची कार आली असता मनोज थिटे, राजाभाऊ मानकरी,श्रीकिशन थिटे,अनिल काळदाते, संदीप राठोड, शरद असे सहा जण अचानक कार समोर आले. त्यांनी मला खाली उतरवून, तुम्ही न विचारता तालुक्यात शासकीय कामे का घेता असे विचारात शिवीगाळ केली. तसेच चाकूचा धाक दाखवून सोनसाखळी, अंगठी व रोख 20 हजार रु असे मिळून एकूण अंदाजे 1 लाख 60 हजार रुपायाचा ऐवज काढून घेतला. या तक्रारीवरून वरील सहाजणांवर गु र न क्रमांक 312/ 18 कलम 395,504 भादवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.