लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा प्रशासनाने आगामी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यासाठी २ हजार ९८६ मतदान यंत्र दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़ हे यंत्र स्ट्राँग रुममध्ये ठेवले आहेत़आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे़ मागील आठवड्यात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फ्रन्सच्या माध्यमातून आवश्यक त्या सूचनाही केल्या होत्या़ त्यानुसार परभणी जिल्ह्यात मतदान केंद्रांची सुसूत्रता करण्याचे काम सुरू झाले आहे़ मागील निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये असलेले मतदान केंद्र आणि मतदारांची संख्या वाढल्यामुळे अपेक्षित वाढीव मतदान केंद्र यांचा आढावा जिल्ह्यातील अधिकारी घेत आहेत़ त्यासाठी तालुकास्तरावरील अधिकाºयांनाही मतदान केंद्रासंदर्भात सूचना देण्यात आल्या़ उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर भेट देऊन तेथील मतदार संख्या व सुविधांच्या अनुषंगाने आढावा घ्यावयाचा असून, जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या व अपेक्षित मतदान केंद्रांची वाढ याचा आढावा घेतला जात आहे़ त्यानंतर जिल्ह्यातून वाढीव मतदान केंद्रांची यादी राज्य निवडणूक आयोगाला सादर करावयाची आहे़ ही प्रक्रिया सुरू असतानाच आता पुढील टप्पाही सुरू झाला आहे़जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक असलेल्या मतदान यंत्राची पूर्तताही केली जात आहे़ दोन दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाला २ हजार ९८६ मतदान यंत्र प्राप्त झाले आहेत़ हे मतदान यंत्र बेंगलोर येथील भेल या कंपनीतून पाठविल्याची माहिती आहे़ परभणी जिल्ह्यामध्ये मागील वर्षी वापरलेले मतदान यंत्रही उपलब्ध आहेत; परंतु, निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन मतदान यंत्र प्राप्त झाले असून, जायकवाडी परिसरातील कल्याण मंडपम् येथे तयार केलेल्या स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहेत़ त्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त लावला आहे़
परभणी जिल्ह्यात मतदान यंत्रे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 12:47 AM