राजन मंगरुळकर, परभणी : पोलीस दलाच्या बॉम्बशोधक व नाशक पथकातील श्वान रिओ याचे अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना सोमवारी निधन झाले. श्वान रिओ याने सात वर्ष एक महिन्याच्या कालावधीत जिल्हा पोलीस दलामध्ये विविध ठिकाणी महत्त्वाचे बंदोबस्त आणि तपासामध्ये मोलाची भूमिका बजावली. त्याच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी पोलीस मुख्यालयातील बॉम्ब शोधक नाशक पथकाच्या कार्यालय परिसरात शासकीय इतमामात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी श्वानाचे अंतिम दर्शन घेत त्यास पुष्पहार अर्पण केला.
बॉम्बशोधक व नाशक पथकातील श्वान रिओ कार्यरत होता. या ठिकाणी अन्य पाच श्वान सध्या कार्यरत आहेत. श्वान रिओ हा सात वर्ष एक महिन्याचा होता. या कालावधीत त्याने येथे कार्य केले. काही दिवसांपासून तो आजारी होता. उपचार सुरु असताना त्याचे निधन झाले. अंत्यविधीप्रसंगी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, राखीव पोलीस निरीक्षक रवीकुमार बांते, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कुरुंदकर इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शासकीय इतमामात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉग हँडलरसह सर्वच हळहळले
श्वान रिओचे निधन झाल्यावर येथील वातावरण सुध्दा निशब्द झाले होते. या अंत्यसंस्कारप्रसंगी डॉग हँडलर सीता वाघमारे, साहेबराव तोटेवाड यांच्यासह सर्वच जण हळहळल्याचे पहावयास मिळाले.
राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल बंदोबस्तात सहभाग
गत सात वर्षात या श्वान रिओने अनेक महत्त्वाचे बंदोबस्त केले. ज्यात पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री व व्हीआयपी दौऱ्यात तसेच ईद, सण उत्सव व रेल्वे स्टेशन, बस स्थानक, गर्दीच्या ठिकाणी जिल्ह्यातील नियमित पाहणी तो करायचा. घातपात विरोधी तपासणीत त्याने पोलीस दलाला सहकार्य केले. पोलीस दलातील कर्तव्य मेळावा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून जिल्हा पोलीस दलाचे चांगल्या प्रकारे नाव उंचावले. दहशतवादी कार्यवाही बाबत डेमो देताना उत्कृष्ट भूमिका निभावली. श्वानाने पंतप्रधानाचा बंदोबस्त सुद्धा केला. एकूण आठ बंदोबस्त केले ज्यात नांदेड, परभणी पीएम बंदोबस्तचा समावेश आहे.