परभणी: मराठवाडयातील काही जिल्हयात शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने ९८ कोटी रूपये नुकसान भरपाई दिली. या शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव वाढत गेला तर भविष्यात शेती करणे कठीण होईल. त्यामुळे कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञांनी यावर त्वरित उपाययोजना शोधून काढण्याच्या सूचना शनिवारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्या.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात २४ सप्टेंबर रोजी आयोजित कृषी प्रदर्शनाची पाहणी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, माजी खासदार ॲड. सुरेश जाधव, दापोली कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य प्रविण देशमुख, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, विभागीय कृषि अधिकार साहेबराव दिवेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे, प्राचार्य डॉ. उदय खोडके, डॉ. गजानन गडदे आदीसह विविध पदाधिकारी, विद्यापीठ शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी कृषी प्रदर्शनीतील विद्यापीठ विकसित विविध पिकांच्या वाण तसेच कृषि तंत्रज्ञानाची माहिती घेतांना सत्तार म्हणाले की, विद्यापीठाने अनेक कमी खर्चीक तंत्रज्ञान विकसित केले आहेत. पिकांची अनेक चांगली वाण विकसित केले आहे. हे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचले पाहिजे. आज शेतकऱ्यांपुढे मजुरांचा मोठा प्रश्न असुन ड्रोन तंत्रज्ञानाचा फवारणी करिता वापर केल्यास कमी वेळात फवारणी करणे शक्य होणार आहे. विद्यापीठाने ड्रोन फवारणीचे प्रशिक्षण आयोजित करावेत. तसेच शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याकरिता सर्वांनी एकत्रित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.