परभणी : तालुक्यातील संबर येथील गुरू आनंद भारती माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकाने परस्पर पर्यवेक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याप्रकरणी जि.प. सीईओ बी.पी. पृथ्वीराज यांनी केंद्र संचालकांसह ११ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी दोन दिवसांपूर्वी पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील हायटेक विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रावरील कॉप्या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात केंद्रप्रमुखांसह ११ जणांवर पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा पृथ्वीराज यांनी परभणी तालुक्यातील संबर येथील गुरू आनंदभारती माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्राला शुक्रवारी अचानक भरारी व बैठे पथकासह भेट दिली.
यावेळी दहावी विज्ञान भाग-१ विषयाचा पेपर सुरू होता. यावेळी नियुक्त केलेल्या पर्यवेक्षकांपैकी एकही शिक्षक उपस्थित नव्हता. केंद्रावर नियुक्त पर्यवेक्षक, कर्मचारी हे केंद्र संचालकांनी अनधिकृतपणे गटशिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी न घेता नियुक्त केल्याचे आढळून आले. विचारपूस केली असता त्यांनी आम्हाला केंद्रसंचालकांनी परीक्षा केंद्रावर येण्यास सांगितल्याचे ते म्हणाले.
याच शाळेतील पाच शिक्षकांची तोंडी नियुक्ती केंद्र संचालकांनी केल्याचा दोघांनी दुजोरा दिला. तसेच पूर्व प्राथमिक शाळेतील एका शिक्षिकेचीही नियुक्ती केली. तसेच खोली क्रमांक ५ मध्ये विज्ञान भाग १ विषयाच्या पेपरच्या हस्तलिखित उत्तराच्या चार प्रती सापडून आल्या. त्या वर्गातील बहुतांश विद्यार्थ्यांनी सदरील भाग लिहिलेला दिसून आला. तसेच बैठे पथकातील नियुक्त कर्मचारी तथा सहाय्यक पशूधन अधिकारी गोविंद मुरुंबेकर हे गैरहजर आढळून आले. परीक्षा केंद्रावर एकही पोलीस किंवा होमगार्डही उपस्थित नव्हता.
यांच्यावर होणार कारवाईकेंद्र संचालक मंगेश बालाजी कोमटवार, सहकेंद्र संचालक परशूराम दौलत कदम, पवन प्रकाशराव गरुड, विद्यासागर चिलवंत, राधा वसंतराव काळे, मंदाकिनी संजय शिंदे, रूपाली दत्तराव दशरथे, नीता गजानन कदम, चक्रधर केशव कोंपलवार, ज्ञानेश्वर भास्करराव चोपडे, मोहन माणिकराव कदम या ११ जणांविरुद्ध परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र विद्यापीठ, मंडळ व इतर निर्विधिष्ठित होणाऱ्या परीक्षेतील गैरप्रकारात प्रतिबंध अधिनियम १९८२ कलम ७ व इतर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश सीईओ पृथ्वीराज यांनी माध्यमिक शिक्षण उपशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. या सोबत या परीक्षा केंद्राच्या भेटीचा अहवालही पृथ्वीराज यांनी दिला आहे.