गंगाखेड : वझूर येथील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा प्रकरणी शेतमालक आणि यंत्रचालक अशा चारजणांविरोधात मंगळवारी ( दि. २८ ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना बुधवारी पोलीसांनी ताब्यात घेतले असून अन्य दोघे फरार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वझुर ( ता. पूर्णा ) येथील गोदावरी नदी पात्रातून यंत्राद्वारे अवैधरित्या वाळु उपसा केल्या जात असल्याची गोपनीय माहिती महसूल पथकाला मिळाली. यावरून सोमवारी ( दि. २७ ) सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील व पूर्णा तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या पथकाने येथे धाड टाकली. यावेळी पथकाने पाच लाख रुपये किंमतीचे वाळू उपसा करणारे यंत्र जप्त केले होते.
याप्रकरणी मंगळवारी ( दि. २८ ) रात्री उशीराने वझुर सज्जाचे तलाठी मारोती जालने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळु उपसा व वाहतूक करण्यासाठी शेतातील जागा व रस्ता उपलब्ध करून देणारा शेतकरी गजानन बालासाहेब डिगोळे आणि यंत्र मालक व चालक यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलीस निरीक्षक वाय.एन. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत जमादार हरिभाऊ शिंदे, पो.ना. रामकीशन कोंडरे यांनी बुधवारी ( दि. २९ ) विठ्ठल लक्ष्मण अडागळे ( ३४,रा. टाकरवण ता. माजलगाव जि. बीड ) व अमोल भगवान लोंढे ( २१, रा. घनसावंगी जि. जालना ) या दोघांना ताब्यात घेतले. तर शेतमालक गजानन डिगोळे व बबलू पवार दोघे ( रा. वझुर ता. पूर्णा ) हे मात्र फरार झाले आहेत.