मानवत (परभणी) : तालुक्यातील रत्नापूर येथे एका घरात शॉटसर्किटमुळे शनिवारी पहाटे दीड वाजता आग लागली. या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र रोख रक्कमेसह ४ लाखांचे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची माहिती आहे.
सुनील सर्जेराव साळवे तालुक्यातील रत्नापूर येथे राहतात. शुक्रवारी रात्री साळवे कुटुंब जेवणानंतर झोपी गेली. अचानक पहाटे दीडवाजता शॉर्टसर्किट होऊन घरात आग लागली. लागलीच घरातील सर्वजण बाहेर पडले. साळवे कुटुंबीयांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वाढतच गेली. या आगीत कपाटात ठेवलेले रोख 32 हजार, दोन क्विंटल ज्वारी, एक क्विंटल गहू, टीव्ही फ्रिज यासह घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्याने चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी आज दुपारी मंडळ अधिकारी जी. डी. बिडवे, तलाठी बी आर गोरे, पोलीस पाटील उत्तम नंदनवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सुनील साळवे यांनी तहसीलदार प्रतीक्षा भुते यांच्याकडे केली आहे.
घरकुल बांधकामासाठी घेतले होते 32 हजारसुनील साळवे यांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. अनुदानाचा पंधरा हजाराचा पहिला हप्ता जमा झाला आहे. यासोबतच खाजगी फायनान्सकडून 32 हजारातून ते घरकुलाचे बांधकाम करणार होते. मात्र, हे ३२ हजार जळून खाक झाले आहेत.