परभणी : येथील जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या परिसरात असलेल्या मांजरा प्रकल्प उपविभाग क्रमांक २ या कार्यालयास आज पहाटे आग लागली. आगीत जुने व महत्त्वपूर्ण असलेले हजारो दस्ताऐवज जळून खाक झाले आहेत.
येथील जायकवाडी परिसरात मांजरा प्रकल्प उपविभाग क्रमांक २ या विभागाचे कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय आहे़ निम्न दूधना प्रकल्पा अंतर्गत या कार्यालयाचा कारभार चालतो़ निम्न दूधना प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचे महत्त्वपूर्ण दस्ताऐवज या कार्यालयात ठेवलेली आहेत़ २९ मे रोजी रात्री २़३० वाजण्याच्या सुमारास कार्यालयातील दस्ताऐवज असलेल्या खोलीलाच आग लागली़ विशेष म्हणजे या खोलीच्या शेजारील खोलीतही महत्त्वपूर्ण जुने दस्ताऐवज ठेवले होते़ त्या खोलीलाही आग लागली़ या आगीत निम्न दूधना प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या जमिनींचे महत्त्वूपर्ण दस्ताऐवज तसेच संयुक्त मोजणी अहवाल, शेतकऱ्यांचे रजिस्टर आदी कागदपत्रे जळून खाक झाली
विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या अनुषंगाने या कागदपत्रांना महत्त्व आहे़ परंतु, नेमकी हीच कागदपत्रे आगीत जळाल्याने ही आग लागली की लावली ? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ रात्री २़३० वाजेच्या सुमारास आग लागल्यानंतर अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले़ त्यानंतर ही आग विझविण्यात आली़ या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली़
५५० दस्ताऐवज जळून खाकजायकवाडी परिसरातील मांजरा प्रकल्पाच्या या कार्यालयास लागलेल्या आगीमध्ये सुमारे ५६७ दस्ताऐवज जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. यात सर्च रिपोर्ट, सातबारा व इतर कागदपत्र जळाल्याची माहिती मिळाली़ त्याच प्रमाणे अतिक्रमणाबाबतची संचिका, भूमिअभिलेख प्रस्ताव पोहनेर, लोकअदालत संचिका, संयुक्त मोजणी संचिका आणि १६ गावांमधील संयुक्त मोजणी नकाशे जळाल्याचा अंदाज आहे़