परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा लस पुरवठा विभागाच्या शीतसाखळीगृहाला मंगळवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत लसीकरणाच्या साहित्यासह पुस्तके, जुन्या मशनरी जळून खाक झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा लस पुरवठा विभागाच्या शीतगृहात बालकांना देण्यात येणार्या लसीकरणाचे साहित्य ठेवण्यात येते. त्याच बरोबर लसीकरणाच्या नोंदीसाठी लागणारी स्टेशनरी मोठ्या प्रमाणात शीतगृहात ठेवण्यात आली होती. परंतु, मंगळवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास अचानक या शीतगृहाला आग लागली. मात्र सुटीचा दिवस असल्याने हे शीतगृह बंद होते. त्यानंतर या गृहाच्या खिडक्यातून धूर निघाल्याने आजुबाजुच्या रुग्णालय प्रशासनाला कळविले. त्यानंतर अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आग अटोक्यात आली. आग कशी लागली, याचे मात्र समजू शकले नाही.