मानवत (परभणी): रूढी शिवारातील गजानन अॅग्रो जिनिंग-प्रेसिंगमध्ये अचानक लागलेल्या आगीतकापूस, सरकी, मशीन्स खाक झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६१ वर गजानन अॅग्रो जिनिंग-प्रेसिंग आहे. हंगाम सुरू असल्याने जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केलेला कापूस पुढील प्रक्रियेसाठी एका शेडमध्ये ठेवण्यात आला आहे. कालच गठन बांधण्याचे काम सुरु झाले आहे. दरम्यान, पहाटे साडेबारा वाजेच्या सुमारास मशीन जवळील कापसाने अचानक पेट घेतला. सर्वत्र कापूसच असल्याने जिनिंग परिसरात झपाट्याने आग वाढत गेली.
जिनिंग मालकाने लागलीच मानवत नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. मात्र, मानवत येथील अग्निशमन दलाचे वाहन पाथरी तालुक्यातील गुंज येथे आग विझवण्यासाठी गेल्याने वेळेत उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे जिनिंग मालकांनी गंगाखेड, परळी, जालना, धारूर या ठिकाणाहून अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाला येण्यासाठी एक ते दीड तासांचा वेळ लागल्याने संपूर्ण कापूस, शेजारच्या शेडमधील सरकीने जळून खाक झाली.
आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय करनूर, सपोनी प्रभाकर कापुरे, आनंद बनसोडे, पोलीस कर्मचारी नरेंद्र कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाचे वाहन पोहोचल्यानंतर आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.