ऑनलाईन लोकमत,
परभणी, दि. २० : या पावसाळ्यात जिल्ह्यात प्रथमच मोठा पाऊस झाला असून, त्यात दोन विद्यार्थिनी वाहून गेल्याची तर एका महिलेच्या अंगावर भिंत कोसळून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली़ त्यामुळे या पावसाने तीन बळी जिल्ह्यात घेतले आहेत़.
दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शनिवारपासून जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला़ शनिवारी मध्यरात्रीनंतर मोठा पाऊस झाला़ प्रशासनाच्या माहितीनुसार सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्हाभरात ४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ पूर्णा तालुक्यातील पूर्णा (७८), ताडकळस (७३), चुडावा (७७) आणि लिमला (८० मिमी) या चार मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे़ या पावसामुळे जिल्ह्यातील ओढे, नाले, प्रथमच ओसंडून वाहू लागले़ परभणी तालुक्यातील इंद्रायणी नदीला पूर आला आहे़ तसेच परभणी शहराजवळून वाहणाºया पिंगळगड नाल्याला पूर आला़ विद्यापीठातून बलस्याकडे जाणा-या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी ठप्प झाला़
पालम तालुक्यातील पारवा येथील नाल्यावरील पूल ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने चुलत बहिणी वाहून गेल्याची घटना रविवारी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास घडली़ आम्रपाली भगवान येवले (१२) आणि किर्ती सोपान येवले (१९) या दोघी पाण्यात वाहून गेल्या़ काही वेळातच त्यांचे मृतदेह सापडले असून, पालम ग्रामीण रुग्णालयात शवविच्छदन करण्यात आले़
पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे भिंत अंगावर पडून प्रभावती चंद्रकांत गायकवाड या ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे़ एकावर एक विटा रचून तयार केलेली ही भिंत रात्री १२ च्या सुमारास पावसामुळे कोसळली आणि त्यात प्रभावती गायकवाड यांचा मृत्यू झाला़
जिल्हाभरात दमदार पाऊस झाला असून, पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्याने सकाळी १० वाजेपर्यंत फळा, सोमेश्वर घोडा, आरखेड आणि उमरथडी या पाच गावांचा संपर्क तुटला होता़ परभणी तालुक्यातील धामोडी नदीला पूर आल्याने आठ गावांचा संपर्क तुटला होता़ दुपारपर्यंत पाणी ओसरले नसल्याने ही गावे संपर्काबाहेर होती़