येलदरी वसाहत (परभणी): रब्बी हंगामातील पिकांना पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात वीज निर्मितीच्या तीन संचापैकी दोन संचामधून दररोज 4 दलघमी एवढे पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे येलदरी धरणावर अवलंबून असलेल्या नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील 60 हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आवर्तन सुरु झाल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, हळद, ऊस, केळी, आदी पिकासाठी पाणी मिळणार आहे. तसेच येलदरी येथील जल विद्युत केंद्रही सुरू होऊन 15 मेगावाट एवढी वीज निर्मिती सुरू झाली आहे. हे पाणी वीज निर्मितीकरून येलदरीतून सिद्धेश्वर धरणात नदीवाटे नेले जाते. सिद्धेश्वरमधून पूर्णा मुख्य कालवा, हट्टा शाखा कालवा, लासीना शाखा कालवा, वसमत शाखा कालवा व अंतिम शाखा कालवा या पाच कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी जल संपदा विभाग नियोजन करत आहे.
या पाच कालव्यामधून परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील मिळून 57 हजार 988 हेक्टर जमीन सिंचनाखाली आलेली आहे. येलदरी येथून सोडलेल्या पाण्यामुळे या भागातील शेतीसह तीन जिल्ह्यातील 250 हून अधिक गावांना देखील पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. यामध्ये परभणी , हिंगोली, पूर्णा, वसमत, जिंतूर, या मोठ्या शहरांचा समावेश होतो.
सध्या शहरासोबत ग्रामीण भागात शेतकरी जास्तवेळ शेतात घालवत आहेत. कित्येक शेतकऱ्यांना आपले सर्व कुटुंब शेतात राहण्यासाठी नेले आहे. आता शेतीसाठी रब्बी हंगामासाठी येलदरीतून पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने मोठा फायदा होणार आहे. मागील चार वर्षांपासून येलदरी धरण 100 टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात झालेल्या नैसर्गिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांनी सोडलेल्या पाण्याचा उपयोग योग्य पध्दतीने करावा, तसेच ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा व पाण्याची बचत करावी असे आवाहन जल संपदा विभागाचे नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता बिराजदार यांनी उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी केले आहे.