मागील वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण जनजीवन ठप्प झाले होते. या आजारावरील प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून, १६ जानेवारी रोजी ती प्रत्यक्ष आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर यांना दिली जाणार आहे. आरोग्य विभागाने लसीकरणाची संपूर्ण तयारी केली आहे. जिल्ह्यात शासकीय आणि खासगी आरोग्य विभागातील ७ हजार ६२९ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोविन ॲपवर नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांनाच रॅडम पद्धतीने ऑनलाइन संदेश पाठवून लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणााठी ५ बुथवर तीन खोल्यांची निर्मिती करण्यात आली आहे, तसेच पाच अधिकारी नियुक्त केले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार लसीकरणाचा टप्पा पार पाडला जाणार आहे.
निर्देशानुसार लसीकरण
१६ जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यात लसीकरण झाल्यानंतर शासनस्तरावरून आलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे टप्प्याटप्प्याने लसीकरण केले जाणार आहे. प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यास लस मिळणार आहे, परंतु त्यासाठी शासनाच्या कोविन या ॲपवर नोंदणी करणे महत्त्वाचे आहे.
‘‘लसीकरणाची रंगीत तालीम यापूर्वी झाली आहे. त्याच धर्तीवर आता ५ बुथवर आता कोरोना लसीकरण केले जाणार आहे. त्याची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, रॅडम पद्धतीने मेसेज पाठवून ५०० लाभार्थ्यांना लसीकरणासाठी बोलविले जाणार आहे.
- डॉ.गणेश सिलसुरवार,जिल्हा माता-बालसंगोपन अधिकारी
नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांनाच लस
आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम कोरोना लसीकरण केले जाणार आहे. त्यातही ज्या कर्मचाऱ्यांनी कोविन ॲपवर नोंदणी केली आहे. त्यांनाच मेसेज पाठवून लसीकरण होणार आहे. नोंदणी केलेल्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याला लस मिळणार असून, अजूनही नोंदणीची संधी उपलब्ध आहे.