परभणी : जिल्ह्यात शनिवारी आरोग्य विभागातील ४०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचे प्रशासनाने निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण झाल्याने ही मोहीम फत्ते झाली आहे.
गेल्या दहा महिन्यांपासून कोरोना संसर्गाने अस्वस्थ असलेल्या परभणीकरांना शनिवारी प्रत्यक्ष लसीकरणानंतर दिलासा मिळाला. प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील चार केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात या मोहिमेची शुक्रवारपासूनच तयार करण्यात आली होती. शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास लसीकरणाला प्रारंभ झाला. सर्वप्रथम येथील भुलतज्ज्ञ डॉ. दुर्गादास पांडे यांनी ही लस घेतली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनीही लस घेतली. यावेळी खासदार बंडू जाधव, खासदार फौजिया खान, आमदार सुरेश वरपूडकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, डॉ. प्रकाश डाके, डॉ. धूतमल आदींची उपस्थिती होती. दिवसभरात येथील केंद्रावर ८४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली.
याशिवाय शहरातील महानगरपालिकेच्या जायकवाडी परिसरातील आरोग्य केंद्रातही लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी मनपा आरोग्य विभागाच्या कर्मचारी सोनाली पागजरे यांनी पहिली, तर संतोष मस्के यांनी दुसरी लस घेतली. यावेळी आमदार सुरेश वरपूडकर, आयुक्त देवीदास पवार, आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंग, डॉ. आरती देऊळगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदींसह नगरसेवक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. या केंद्रावर १०० कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण करण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयातील डॉ.बाहेकर, सय्यद इरफान, नीलेश जोगदंड, रणजित चांदीवाले, शीला भदर्गे आदींची उपस्थिती होती.
जांब येथे सर्वाधिक लसीकरण
जिल्हा परिषदेच्या जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १२० कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली. यावेळी औषध निर्माण अधिकारी सर्जेराव देशमुख यांनी पहिली लस घेतली. यावेळी जि. प. अध्यक्ष निर्मलाताई विटेकर, सीईओ शिवानंद टाकसाळे, जि. प. च्या आरोग्य व शिक्षण सभापती अंजलीताई आणेराव, जि. प. सदस्य बाळासाहेब रेंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकर देशमुख, डॉ.गणेश सिरसुलवार आदींची उपस्थिती होती. दुपारच्या वेळी येथील केंद्राला जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
असे सुरू झाले लसीकरण
लसीकरण केंद्राला कर्मचाऱ्यांनी फुले आणि रंगीत रांगोळ्यांनी सजविले होते. को-विन ॲपवरील नोंदणीनुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना लस देण्यात येत होती. लसीकरणानंतर ॲपवर लसीकरण झाल्याची नोंददेखील घेण्यात आली. लसीकरणानंतर कर्मचाऱ्यांना ३० मिनिटे तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष तसेच आरोग्य सभापती यांनी प्रतीक्षा कक्षातील कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी निरीक्षण कक्षात लसीकरण झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. जि. प. सीईओ शिवानंद टाकसाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख हेे केंद्रावर उपस्थित होते.