परभणी: कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर ती सर्वात आधी जिल्ह्यातील सुमारे ९ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले आहे.
राज्यात कोरोनाच्या संसर्गाने मागील काही महिन्यांपासून थैमान घातले असले तरी सध्या हा संसर्ग बऱ्यापैकी कमी झाला आहे. तर दुसरीकडे कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होण्याचे संकेतही मिळत आहेत. याच अनुषंगाने आरोग्य विभागाने जिल्ह्यातील माहिती संकलनाला सुरुवात केली आहे. सर्व प्रथम फ्रंटलाईन वर्कर्सला ही लस देण्याचे निश्चित झाले असून प्रधान सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आरोग्य कर्मचाऱ्यांचा डाटा मागविला आहे. त्यामध्ये शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि मनपास्तरावर माहिती संकलित केली जात आहे. खाजगी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची माहितीही मनपा संकलित करीत आहे. एकंदर ही माहिती अंतिम झाली नसली तरी चारही क्षेत्रातील सुमारे ९ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम लसीचा लाभ मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला होता. त्या तुलनेत ऑक्टोबरपासून हा संसर्ग कमी झाला आहे. दररोज सरासरी ८० ते ९० रुग्ण नोंद होत होते. सध्या सरासरी ३० ते ४० रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे कोरोना परतीच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात सध्या ६ हजार ६३४ एकूण रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ६ हजार १५१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २१६ रुग्ण उपचार घेत आहेत.
नियंत्रणासाठी काळजी घेणे गरजेचे कोरोनाची लस अद्याप उपलब्ध झालेली नाही. ही लस प्राप्त होण्यास पुढील वर्षातील साधारणत: मार्च महिना उजाडू शकतो. तोपर्यंत प्रत्येकाने कोरोनाच्या संदर्भाने काळजी घेणे आवश्यक आहे. हा संसर्ग वाढणार नाही, याची दक्षात घेऊन मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्स या नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. दुर्गादास पांडे यांनी केले आहे. सध्या हा संसर्ग कमी झालेला आहे. आरोग्य विभागाने तपासण्या वाढविल्या असल्या तरी प्रत्यक्षात लक्षणे असणारे रुग्ण तपासणीसाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे प्रमाणही कमी दिसत आहे. कोरोनाचे लक्षणे आढळल्यास तपासणी करणे आवश्यक आहे. कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांनाही पुढील काळात काळजी घेण्याची आवश्यकता आहे. एकंदर नियमांचे पालन केल्यास संसर्ग आटोक्यात राहू शकतो, असे डॉ. पांडे यांनी सांगितले.
कोणाला मिळणार लस?शासकीय कर्मचारी : वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, आरोग्य सेविका, आशा वर्कर, परिचर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सहाय्यक, लिपीकखाजगी कर्मचारी : खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, रुग्णालयातील वार्डबॉय आणि व्यवस्थापन विभागातील कर्मचारी.
जिल्हास्तरावर काय तयारी सुरु आहेजिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र तक्ता तयार करुन त्यानुसार माहिती संकलित करण्याचे काम सुरु केले आहे. जि.प. आरोग्य विभाग, मनपा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयातून ही माहिती एकत्रित केली जात आहे.
कोरोनाचा संसर्ग पूर्णत: परतलेला नाही. आगामी काळात दिवाळीचा सण आहे. त्यामुळे नागरिकांची आवक-जावक वाढून संसर्ग वाढू शकतो. आपल्या भागात प्रतिकार शक्ती अधिक असल्याने कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे हा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. -डॉ.संजय हरबडे, वैद्यकीय अधीक्षक , सेलू