लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यातील कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने तीन दिवसांपासून पाच गावे अंधारात असून, अनेक गावांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे़ दरम्यान, श्री विसर्जनही ग्रामस्थांना अंधारातच करावे लागले़कान्हाड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रातून कान्हड, सिमणगाव, गव्हा, कुपटा, पारडी, कौसडी, मारवाडी, तांदूळवाडी, आडगाव, गुळखंड व हट्टा या गावांना वीज पुरवठा करण्यात येतो़ २२ सप्टेंबर रोजी कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेदं्रातील रोहित्रामध्ये मोठा बिघाड झाल्याने वीज उपकेंद्रांतर्गत असलेल्या गावांतून वीज गायब झाली आहे़ पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील पिकांना कृषीपंपाद्वारे पाणी देण्यात येत आहे़ त्यामुळे कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रातील रोहित्रावर क्षमतेपेक्षा अधिक भार आल्याने वारंवार बिघाड होत आहे़ त्यानंतर अनेक गावांना अंधारात रात्र काढावी लागत आहे़ त्यामुळे महावितरणकडून बोरी येथील ३३ केव्ही उपकेंंद्रातून वीज पुरवठा करण्याच्या हालचाली करण्यात आल्या़ त्यानंतर बोरी येथून कान्हड, सिमणगाव, गव्हा, पार्डी, कौसडी, मारवाडी इ. गावांना वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे़ मात्र कुपटा, तांदूळवाडी, आडगाव, गुळखंड व हट्टा या पाच गावांचा वीज पुरवठा सोमवारी दुपारपर्यंत सुरळीत झाला नव्हता़ रोहित्रात बिघाड झाल्याने अनेक गावांची बत्ती गायब झाली़ त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ पिण्याचे पाणी, दळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ तसेच पाणीपुरवठा योजना विजेअभावी ठप्प पडली आहे़ वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत़ कृषीपंपांचा भार वाढत असल्याने कान्हड येथील ३३ केव्ही केंद्रांवर अधिकचा भार पडत आहे़ यामुळे रोहित्रात वारंवार बिघाड होत आहे़ त्यातच शनिवारी रोहित्रात बिघाड झाल्याने अनेक गावांवर विजेचे संकट ओढवले आहे़
परभणी जिल्ह्यात पाच गावे अंधारात : कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:31 AM