पालम : शहराजवळील लेंडी नदीला मंगळवारी ( दि. १५ ) दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक पूर आला. यामुळे पाच गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. सकाळी पालम शहरात बाजारपेठेत आलेले ग्रामस्थ यामुळे अडकून पडले आहेत.
पालम शहरापासून अर्धा किमी अंतरावर जांभूळबेट रस्त्यावर कमी उंचीचा पूल पावसाळ्यात पाच गावातील नागरिकांची डोकेदुखी बनला आहे. तासभर पाउस पडताच पूर येऊन केव्हा रस्ता बंद पडेल हे सांगता येत नाही. १५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होती. मात्र , अचानक पूर आल्याने ३ वाजता रस्ता बंद पडला. त्यामुळे आरखेड, सोमेश्वर, घोडा, फळा व उमरथडी या गावांचा संपर्क तुटला आहे.
आजवर नेहमी पहाटे नदीला पूर येण्याचा अनुभव आहे. या वेळी दुपारी आल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली आहे. पालममध्ये आलेले ग्रामस्थ शहरात अडकून पडले आहेत. तर पूराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून अनेकांनी गाव गाठले आहे. या पूराच्या प्रश्नाकडे लोक प्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांचे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने गैरसोय वाढली आहे.