परभणी, दि. 19 : पकडलेली जीप सोडून देण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात जीपचालकाच्या परिवारातील सदस्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांशी हुज्जत घालून त्यांच्या खुर्चीच्या दिशेने चप्पल भिरकावल्याचा प्रकार आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी दोन्ही बाजूने तक्रार नोंदविण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू आहे.
या घटने संदर्भात प्राप्त झालेली माहिती अशी कि, आॅगस्ट महिन्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहनांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी इतर जिल्ह्यातून परभणीत पथक आले होते. या पथकाने २२ आॅगस्ट रोजी शहरातील गंगाखेड रोडवर एम.एच.२६/एल ५५८ ही जीप पकडली. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करीत असल्याने जीपवर कारवाई करण्यात आली. भारत दराडे यांची ही जीप आहे. २३ आॅगस्ट रोजी जीप सोडवून नेण्यासंदर्भातील पत्रही दराडे यांना पाठविण्यात आले.
यानंतर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भारत दराडे, त्यांचा मुलगा सुनील दराडे, पत्नी सुरेखा दराडे, आई दगडूबाई दराडे असा संपूर्ण परिवार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात दाखल झाला. यावेळी दराडे यांनी व त्यांच्या कुटुंबाने उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांकडे गाडी सोडण्याची मागणी केली. मात्र, कागदपत्र दाखवा आणि गाडी घेऊन जा, असे त्यांनी सांगितले. यातूनच वाद वाढत गेला आणि दराडे यांच्या सासू व पत्नी यांनी आक्रमक होऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रकाश जाधव यांच्या खुर्चीच्या दिशेने चप्पल भिरकावली. तसेच त्यांना शिवीगाळही केली. या प्रकारामुळे कार्यालयातील कर्मचारी जमा झाले. याची माहिती मिळताच नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही.व्ही. श्रीमनवार, सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे हे घटनास्थळी दाखले.
दरम्यान, या प्रकरणी सायंकाळी ४ वाजेपर्यंत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रकाश जाधव यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. तसेच दराडे कुटुंबियांच्या वतीनेही उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांविरुद्ध तक्रार देण्याचे काम सुरू होते.