परभणी : शहराजवळील ब्राह्मणगाव परिसरात एका ट्रकमधून बेंटेक्स मण्यांचा एक बॉक्स खाली पडला. त्यात असलेले मणी सर्वदूर विखुरले गेले. हे मणी सोन्याचे असल्याची अफवा क्षणार्धात परिसरात पोहोचली, आणि कामधंदे सोडून महिला, तरुण, वृद्ध, बालके हे सर्वच ते वेचण्यासाठी धावले. मात्र, नंतर हे मणी बेंटेक्सचे असल्याचे समजल्यानंतर सर्वांचा भ्रमनिरास झाला. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून बुधवारी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला.
१६ डिसेंबर रोजी दुपारी साधारणत: एक वाजेच्या सुमारास या परभणीहून गंगाखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ब्राह्मणगाव पाटी येथे बेंटेक्सच्या दागिन्यांची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकमधून एक बॉक्स खाली पडला. पडलेल्या बॉक्समध्ये मणी असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले. हे मणी सोन्याचे असल्याची अफवा पसरली. त्यामुळे ते वेचण्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांची एकच धावाधाव सुरू झाली. यात वृद्ध नागरिकांसह, महिला व बालकांचाही समावेश होता. रस्त्याने जाणाऱ्या सुटा-बुटातील सुशिक्षितांनाही सोन्याचा मोह आवरला नाही. तेही आपली वाहने थांबवून रस्त्यावर मणी वेचताना दिसत होते. रस्त्याच्या मधोमध मणी वेचणारांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. मात्र, सोन्याचा हा मोह फार काळ टिकला नाही.
...आणि सर्वांचे चेहरे पडलेरस्त्यावर विखुरलेले मणी वेचण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात धावाधाव आटापिटा केला. मात्र काही वेळाने हे मणी सोन्याचे नसून बेंटेक्सचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांचाच हिरमोड झाला. त्यानंतर सर्वांनी ओशाळलेल्या नजरेने तेथून काढता पाय घेतला. या सर्व प्रकाराचा एक व्हिडिओ बुधवारी काही जणांच्या व्हॉटस्अॅपवर आल्यानंतर जिल्हाभरात हा प्रकार चर्चेचा विषय ठरला. या प्रकाराविषयी स्थानिक पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नाही.