पूर्णा (परभणी ) : पूर्णा नदीच्या पाण्याची पातळी रात्रीतून वाढल्याने नदी काठच्या तीन गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. आज पहाटेपासून या गावाचा शहराशी संपर्क तुटलेला होता.
येलदरी सिद्धेश्वर धरणातून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पूर्णा, थुना या दोन्ही नद्या उफाळून वाहत आहेत. बुधवारी रात्री पाण्याची पातळी वाढत गेल्याने पूर्णा नदी काठच्या पिपळगाव सुकी, कौडगाव, संनलापूर या तीन गावांना पुराने वेढले आहे. गावातून बाहेर पडणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत. पूर्णा नदीसह जवळून वाहणाऱ्या थुना नदीला पाण्याची आवक वाढत आहे.
मागील तीन दिवसांपासून शहर व परिसरात पूरजन्य परिस्तिथी असताना तालुका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची पूर्व तयारी केली जात नसल्याचे दिसून आले. नदीकाठच्या गावांना केवळ सतर्कतेचा इशारा देऊन मोकळे झालेले प्रशासकीय अधिकारी पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर कामाला लागले. कौडगाव, पिंपळगांव, सनलापूर या तीन गावाची लोकसंख्या 7 हजार असून अनेक नागरिक शेती आखाड्यात अडकली आहेत.