परभणी : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पाऊस होत असून, नद्यांना पूर आल्याने अनेक मार्ग ठप्प झाले आहेत. पालम तालुक्यात लेंडी आणि गळाटी नद्यांना पूर आल्याने १३ गावांचा संपर्क तुटला आहे, तर इंद्रायणी नदीच्या पुरात एकजण वाहून गेल्याची घटना गंगाखेड तालुक्यात घडली.
जालना जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पात आवक वाढल्याने रविवारी या प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडले होते. दुधना नदीला पूर आल्याने मानवत तालुक्यातील मानवत- वालुर हा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद होता. तसेच परभणी- काष्टगाव मार्गही ठप्प झाला आहे. सेलू तालुक्यातील कुपटा येथील ओढ्याला पूर आला आहे. त्याचप्रमाणे गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड ते नागठाणा या मार्गावर सायाळा सुनेगाव येथे इंद्रायणी नदीच्या पुरात एकजण वाहून गेला आहे. सुधाकर शेषराव सूर्यवंशी असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दुसरीकडे ढालेगाव बंधाऱ्यातून १६ गेटमधून १ लाख ६२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात केला जात असल्याने गोदावरीला पूर आला आहे.