गंगाखेड: परभणी महामार्गावर असलेल्या नागठाणा पाटी येथून सुनेगाव मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर इंद्रायणी नदीच्या पुराचे पाणी पुलावर आल्याने रात्री १२ वाजेनंतर या मार्गावरील सात गावांचा संपर्क तुटला आहे. सोमवार रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत ही मार्ग खुला झाला नसल्याने पुलाच्या दोन्ही बाजूने नागरिकांची गर्दी जमा झाली होती. इंद्रायणी नदीला पूर येताच सुनेगाव येथील पुलावर पाणी येऊन संपर्क तुटत असल्याने या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी केली जात आहे.
रविवारी दुपारनंतर तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला. जोरदार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. यामुळे गंगाखेड येथून परभणीकडे जाणाऱ्या महामार्गावरील नागठाणापाटी येथून सुनेगाव मार्गे सायळा, मुळी, नागठाणा, धसाडी, अंगलगाव, धारखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुनेगावाजवळ असलेल्या इंद्रायणी नदीच्या पुलाला असलेल्या नळकांड्यामध्ये पुराच्या पाण्याबरोबर आलेले फुर्सन अडकल्याने रविवार रोजीच्या रात्री सुनेगाव येथील इंद्रायणी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले. रात्री बारा वाजेपासून परभणी महामार्ग ते सुनेगाव मार्गे सायळा, धसाडी, आंगलगाव, मुळी, नागठाणा, धारखेड आदी गावांकडे जाणारा मार्ग बंद झाल्याने या गावांचा संपर्क तुटला होता. सोमवार रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत ही पुलावरील पाणी कमी न झाल्याने पुलाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही दुचाकी चालक व नागरिक जीव धोक्यात घालून पुलावरील पाण्यातून मार्ग काढत होते. नुकतेच रस्त्याचे काम होऊन सुद्धा पुलाची उंची वाढविली गेली नसल्याने परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. पुलाची उंची लवकर वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली जात आहे.