मानवत (परभणी) : तालुक्यातील रामे टाकळी, वझुर बुद्रुक शिवारातील नुकसानग्रस्त पिकांची सोमवारी छत्रपती संभाजी राजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत तातडीची मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडू, असे आश्वासन यावेळी नेत्यांनी शेतकऱ्यांना दिले.
तालुक्यात १ व २ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला. शिवाय सतत झालेल्या पावसामुळे तालुक्यातील कापूस, सोयाबीन, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची सोमवारी छत्रपती संभाजी राजे, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांनी पाहणी केली. यावेळी पाथरी पोखर्णी रस्त्यावरील रामे टाकळी आणि वझुर बु. शिवारात नुकसानीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकरी बांधवांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारला धारेवर धरणार असल्याचे नेते म्हणाले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, गजानन तुरे, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोढे, विठ्ठल चौकट, नामदेव काळे, दत्तराव परांडे, अर्जुन काळे, गोपाळ काळे, रंजीत चव्हाण, संजय चौखट आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
भर पावसात केली पाहणी छत्रपती संभाजीराजे, माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी वजूर येथे आले असता पाऊस सुरू झाला. यावेळी भर पावसातच या नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.