मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले ॲड. गोविंदराव नानल हे परभणीतील जुन्या मेहबूब बाग (आताचे नानलपेठ) येथे वास्तव्याला होते. त्यावेळी ॲड. नानल यांना सामाजिक प्रतिष्ठा होती. सर्व धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन धन एकत्रित करून स्वातंत्र्यासाठी लढा उभारण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्यातूनच परभणी शहरातील नागरिकांना एकत्रित करून त्यांनी सर्व प्रथम नानलपेठमध्ये १९३२ मध्ये पहिली बैठक घेतली. या बैठकीकडे निजाम सरकारने फारसे महत्त्व दिले नाही. मात्र त्यानंतर १९३२ मध्ये नानलपेठ येथेच पार पडलेल्या बैठकीत सशस्त्र लढा उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर सेलूत पार पडलेल्या बैठकीस त्यास मूर्त स्वरूप प्राप्त झाले. पुढे परतूर येथे पार पडलेल्या शिबिरात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बंड करून खऱ्या अर्थाने या सशस्त्र लढ्याला प्रारंभ केला.
ॲड. गोविंदराव नानल यांनी सशस्त्र लढा उभारण्यासाठी दिलेले योगदान मोठे आहे. येथूनच पुढे हा लढा पेटला आणि निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाला.
दरवर्षी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जातो. मात्र ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी हा लढा उभारण्यासाठी प्राणपणाला लावले. अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या वास्तू जतन करण्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. ज्या ठिकाणी सशस्त्र लढ्याची पहिली ठिणगी पडली अशी नानलपेठ भागातील वास्तू समस्त परभणीकरांसाठी प्रेरणा देणारी आहे, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या वास्तूची दुरवस्था झाली आहे.
विद्युत रोहित्राआड नामफलक
स्वातंत्र्य सैनिक ॲड. गोविंदराव नानल यांच्या कार्याची दखल घेऊन शहरातील नानलपेठ भागातील मार्गाला स्वातंत्र्य सैनिक गोविंदराव नानल मार्ग असे नामकरण करण्यात आले. मात्र हा नामफलक विद्युत रोहित्राच्या आड गेला असून, अनेक छोट्या झाडींनी वेढला आहे. त्यामुळे नामफलक दर्शनी भागात लावण्याचे औचित्यही कोणी पार पडले नाही, असेच म्हणावे लागेल.