परभणी येथे या अनुषंगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोधणे म्हणाले की, मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील सामान्य जनता, शेतकरी, निराधार व दिव्यांग यांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाने आवाज उठवून त्या समस्या सोडविण्याचे काम केले आहे. तसेच कोविड संसर्ग कालावधीत जनसेवेची भूमिका पक्षाने कायम ठेवली. कोरोनातील कामांमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये पक्षाबद्दल विश्वासार्हता वाढली आहे. त्याकरीता जिल्हयातील जनता विकासासाठी एक आग्रहीपक्ष म्हणून प्रहार जनशक्तीकडे पाहत आहे. हा पक्ष राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आहे. जिल्ह्यामधील विकासाचे प्रश्न हे स्थानिक पातळीवर वेगळ्या स्वरुपाचे असल्याने हे प्रश्न सोडविण्यासाठी आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पक्षप्रमुख राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये अनेक वर्षांपासून ठरावीक पक्ष व ठरावीक नेत्यांचीच सत्ता आहे. या नेत्यांकडून स्वत:च्या सोयीचे राजकारण केले जाते. त्यामुळे जिल्ह्याचा विकास झालेला नाही. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरच आगामी निवडणुका लढवणार असल्याचे बोधणे म्हणले. यावेळी युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, भास्कर तारे, पिंटू कदम, ज्ञानेश्वर पंढरकर, गोविंद मगर, युवराज राठोड, प्रमुख बंडू पावडे आदी उपस्थित होते.
आगामी निवडणुका प्रहार स्वबळावर लढवणार - बोधणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:13 AM