गंगाखेड: कोरोना बाधीत झालेल्या नागठाणा येथील वृद्ध महिलेच्या संपर्कात आलेल्या एकूण ४६ जणांना रुग्णालयात तर पिंप्री येथील काही ऑटो चालकांना पिंप्री जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. यात मुंबई येथून सोबत आलेल्या तालुक्यातील माखणी येथील १९, राणीसावरगाव येथील ३, शहरातील ५, नागठाणा येथील ८ जणांसह एकूण ३५ जणांचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर, तीन परिचारिका, दोन सेविका, एक खाजगी रुग्णवाहिका चालक, अन्य एक इसम व १०८ रुग्णवाहिकेच्या डॉक्टर तसेच चालकाचा समावेश आहे.
मुंबई येथून टेंपोने गावी परतलेल्या तालुक्यातील नागठाणा येथील वृद्ध महिलेला कोरोना विषाणूंची बाधा झाल्याचा अहवाल दि. २० मे बुधवार रोजी प्राप्त झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दि. १८ मे रोजी गंगाखेड तालुक्यात आलेल्या या महिलेच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह येताच खळबळून जागे झालेल्या आरोग्य, महसूल व पोलीस प्रशासनाने ही महिला कोणत्या टेंपोने आली. तिच्या सोबत आणखीन कोण कोणत्या व्यक्ती होत्या ती कोणाच्या संपर्कात आली याची माहिती जमवत वृद्ध महिलेसोबत मुंबई येथून टेंपोत आलेल्या माखणी येथील १९, राणीसावरगाव येथील ३, गंगाखेड शहरातील ५ जणांसह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात वृद्ध महिलेची तपासणी करून तिच्यावर उपचार करणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर, तीन परिचारिका, दोन सेविका, नागठाणा गावात वृद्ध महिलेला पाणी देणारा एक, जेवण देणारे दोघे जण, मुलगा, सून, दोन नातू व गावातील अन्य एक जणासह वृद्धेला नागठाणा येथून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात आणणारे १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतील डॉक्टर व चालक, उपजिल्हा रुग्णालयात संपर्कात आलेले शहरातील एक इसम व एक खाजगी रुग्णवाहिका चालक अशा एकूण ४६ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
यातील दहा जणांचे स्वॅब नमुने दि. २१ मे गुरुवार रोजी घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. मुंबई येथून सोबत आलेली एक महिला लोहा येथे तर दोघे जण अहमदपूर येथे गेल्याची माहिती समोर आल्याने या तिघांची माहिती अहमदपूर व लोहा येथे कळविण्यात आली आहे. मुंबई येथून टेंपोत गंगाखेड येथे आल्यानंतर सदर वृद्धेने गंगाखेड ते नागठाणा दरम्यान पिंप्री येथील प्रवासी ऑटोने प्रवास केला होता मात्र हा ऑटो चालक कोण याची माहिती समोर आली नसल्याने पिंप्री येथील सर्वच प्रवासी ऑटो चालकांना पिंप्री जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. वृद्ध महिलेच्या संपर्कात आलेल्या इतरांच्या अहवालाकडे तालुका वासीयांचे लक्ष लागले आहे.
घरोघरी कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंध सर्व्हेक्षणतालुक्यातील नागठाणा येथील वृद्ध महिलेचा स्वॅब अहवाल कोरोना बाधीत आल्याने प्रशासनाने नागठाणा हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करून मुळी मार्गे गावात जाणारा मुख्य रस्ता तसेच पिंप्री येथून गोदावरी नदी पात्रातून गावात जाणारा रस्ता बांबू लावून बंद केला आहे. दि. २१ मे गुरुवार रोजी सकाळी तहसीलदार स्वरूप कंकाळ, गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर, पोलीस निरीक्षक वाय. एन. शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार यांनी नागठाणा येथे भेट देऊन पाहणी केली व आरोग्य विभागाच्या चार पथकामार्फत गावातील घरोघरी जाऊन कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंध सर्व्हेक्षण तसेच निर्जंतणुकीकरणाची फवारणी करण्यात आली.