हातगाड्यांचा अडथळा कायम
परभणी : येथील अष्टभूजा देवी मंदिर परिसर आणि आर.आर. चौक भागात मोठ्या प्रमाणात हातगाडे विक्रेते थांबतात. फळ आणि भाजीपाल्याची या ठिकाणी विक्री होते. हा रस्ता अरुंद असून रस्त्याच्या बाजूचा भाग हातगाड्यांनी व्यापल्याने वाहतुकीसाठी रस्ता शिल्लक राहत नाही . हातगाडे चालकांना पर्यायी जागा उपलब्ध करुन दिल्यास या भागातील वाहतुकीची समस्या निकाली काढण्यास मदत होणार आहे.
कारवाई संथगतीने
परभणी : मास्क आणि फिजिकल डिस्टन्स या दोन्ही नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने शहरात तीन पथकांची स्थापना केली आहे. पथकांची स्थापना करुन दोन दिवसांचा कालावधी उलटला तरी एकही करावी झालेली नाही. शहरातील बाजारपेठ भागात दररोज फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडत आहे. याशिवाय अनेक नागरिक मास्क न वापरता फिरत आहेत. मात्र कारवाई होत नसल्याने नियम मोडण्याचे प्रमाण वाढले आहे.
रस्ता उखडला
परभणी : येथील उड्डाणपूल परिसरातून कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रवेश करणारा रस्ता जागोजागी उखडला आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. बाजार समितीत कृषी माल घेऊन येणारी वाहने याच मार्गाने आणली जातात. मात्र रस्ता खराब असल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. बाजार समिती प्रशासनाने या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.