परभणी : शहरातील खंडोबा बाजार परिसरात लोखंडी पत्राच्या शेडमध्ये स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला अवैधरित्या गांजा बाळगल्याचा प्रकार आढळून आला आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नानलपेठ ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्येपोड यांनी फिर्याद दिली. खंडोबा बाजार परिसरात सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला एका धार्मिक स्थळाच्या समोरील लोखंडी पत्राच्या शेडमध्ये नायलॉनच्या थैलीत अंमली पदार्थ असलेला हिरवट रंगाचा पाला, काड्या व बिया मिश्रित ओलसर उग्र वास येत असलेला मोकळा गांजा विक्री करता बाळगल्याचे आढळून आले. यामध्ये चार प्लास्टिक पॉकेट ज्याचे वजन चार किलो ४५० ग्रॅम इतके होते. प्रति किलो दहा हजार रुपये प्रमाणे एकूण ४४ हजार ४५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यामध्ये फिरोज कुरेशी उर्फ बाली मोहम्मद कुरेशी याने त्याच्या ताब्यात हा गांजा विनापरवाना बाळगुन एनडीपीएस तरतुदीचा भंग करून विक्री करता बाळगल्याचे मिळून आले. यामध्ये फिरोज कुरेशी उर्फ बाली मोहम्मद कुरेशी आणि शेख सिकंदर शेख मोहसीन या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांनी भेट दिली. पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड तपास करीत आहे.