परभणी : प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांमधून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात आले असून, आतापर्यंत ४ हजार ७८४ हेक्टर शेतजमीन कालव्याच्या माध्यमातून सिंचनाखाली आली आहे. शेतकऱ्यांकडे शाश्वत पाणीसाठा उपलब्ध असल्याने कालवा सिंचनाचे क्षेत्र घटले आहे.
शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने निम्न दुधना प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पातून आता पूर्ण क्षमतेने पाणी दिले जात आहे. प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या या दोन्ही कालव्यांतून यावर्षी रब्बी, खरीप आणि उन्हाळी या तिन्ही हंगामांसाठी पाण्याचे आवर्तन देण्यात आले. माजलगाव कालवा विभाग क्रमांक १०चे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी दोन्ही हंगामांसाठी पाण्याचे नियोजन करून पाणी आवर्तन दिले. या प्रकल्पाच्या कालव्याच्या माध्यमातून २८ हजार ६८४ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. मात्र, प्रत्यक्षात ४ हजार ७८४ हेक्टर सिंचन झाले आहे. कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडले असले तरी बहुतांश शेतकऱ्यांकडे पाणी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कालव्याच्या पाण्याचा वापर केला नाही. परिणामी सिंचनाचे क्षेत्र घटले आहे.
१५३ किमी लांबीचे कालवे
निम्न दुधना प्रकल्पाचा उजवा कालवा ८४ किमी लांबीचा आहे, तर डावा कालवा ६९ किलोमीटर लांबीचा असून, चाऱ्याच्या माध्यमातून ८१ किमीपर्यंत पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी उजव्या कालव्यातून ६२ किलोमीटरपर्यंत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. डाव्या कालव्याच्या माध्यमातून एकूण ६९ किमीपर्यंत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. दोन्ही कालव्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत असल्याने कालव्यांच्या कार्यक्षेत्रात बागायती पिकांचे प्रमाण वाढले आहे.