सेलू (जि.परभणी) : सेलू शहरातील आत्रेनगर भागातील चार घरात चोरट्यांनी घरफोडी केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. आवटे दाम्पत्याच्या घरातून रोख रक्कम, मोबाइल, दागिने मिळून १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याबाबत सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. इतर तीन घरातूनही २५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
आत्रेनगर भागातील रहिवासी अनिल आवटे हे पत्नीसह सेलू पोलिस ठाण्यात सोमवारी सकाळी ६ वा. आले. त्यांनी १४ मे रोजी आम्ही रात्री झोपले होते. पहाटे उठल्यानंतर दरवाजा उघडा दिसला, घरात पाहणी केली असता कपाटामधून चोरट्यांनी रोख पन्नास हजार रुपये, सोन्याचे मंगळसूत्र, मोबाइल आदी १ लाख १७ हजार रुपये किमतीचा ऐवज लुटला अशी कैफियत पोलिसांसमोर मांडली. त्यानंतर ३ तासांनी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला. यावेळी ओवटे यांचे १ लाख १७ हजारांचा ऐवज तर किशोर कुलकर्णी यांचे घरातील १० हजार, योगेश साळेगावकर यांचे घरातील ६ हजारांचे साहित्य तर मनोज खापरखुंटीकर यांचे घरातील १० हजार रुपये साहित्याची चोरी झाल्याचे पुढे आले आहे. या अनिल आवटे यांचे तक्रारीवरून सेलू पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या संदर्भात पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांना सोमवारी सकाळी विचारले असता शहरात शांती असल्याचे म्हणाले. मग या घटनेबाबत पोलिस निरीक्षक अनभिज्ञ कसे..? असा सवालही पुढे आला आहे.
ठसे तज्ज्ञ, श्वान पथकाचे पाचारणघटनेनंतर पोलिसांनी परभणी येथील फिंगर व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पथक दुपारी २:३० वा. घटनास्थळी दाखल झाले. मात्र चोरट्यांचा माग या दोन्ही पथकाला मिळू शकला नाही. दरम्यान या घटनेमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांचा पुढे पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी केली जात आहे.