सोनपेठ तालुक्यातील चुकार पिंप्री येथील विवाह सोहळा आटोपून गंगाखेड-परळी रस्त्याने एमएच- २३ टीआर- ३११ या ऑटोतून चार जण परळीकडे निघाले होते. गंगाखेड शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या करम पाटीजवळ सायंकाळी ६.३० च्या सुमारास ऑटो आणि एमएच- २२ एएन- ५१२१ क्रमांकाच्या हायवाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात हायवाने ऑटोला रस्त्याखाली ओढत नेले. त्यामुळे ऑटोचा चुराडा झाला. ऑटोमधील विशाल बागवाले (२०), दत्ता भागवत सोळंके (२५), आकाश चौधरी (२३) आणि ऑटो चालक मुकुंद मस्के (२२, सर्व रा. अंबाजोगाई) हे जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती मिळताच सोनपेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने, फौजदार देवराव मुंडे, पांडुरंग काळे, गणेश नाटकर, गोपाळ खंदारे, गंगाखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, स.पो.नि. राजेश राठोड, फौजदार टी.टी. शिंदे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी हायवाखाली दबलेल्या ऑटोला आणि त्यातील मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी करम, निळा, वडगाव स्टेशन येथील ग्रामस्थांनी मदत केली. रात्री ८.३० वाजता चारही मृतदेह ऑटोतून काढण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, अपघात घडताच हायवा चालक फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
फोटो ओळी : गंगाखेड- परळी रस्त्यावर करम पाटीजवळ झालेल्या हायवा-ऑटो अपघाताचे हे दृश्य.
फोटो नंबर : १३ पीपीएच २५, १३ पीपीएच २६