जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवैधरीत्या शस्त्रसाठा बाळगणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परजिल्ह्यातून हे शस्त्र परभणीत आणले जात आहे. प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप काकडे व पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्र साठा असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांच्यासह कर्मचारी राठोड, डोळे, बोकरे, लिंबाळकर, मुरकुटे, ढगे, सुरनर आदींनी तालुक्यातील झरी येथे किशनसिंग बावरी, बालसिंग बावरी, रोहितसिंग जुनी यांच्या घरी १० जुलै रोजी रात्री छापा टाकला. यावेळी घरातून दोन तलवारी, चार खंजीर आणि एक भरमार बंदूक असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंगणापूर या गावातही पोलिसांनी छापा टाकून शस्त्र जप्त केले आहेत. दैठणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने, उपनिरीक्षक आदोडे, कर्मचारी मुलगीर, कुकडे, देशमुख, राठोड आदींनी १० जुलै रोजी रात्री सिंगणापूर येथे प्रकाश अशोक मस्के (२२) याच्या घरी छापा टाकला, तेव्हा दोन तलवार, एक खंजीर असा शस्त्रसाठा मिळाला. याप्रकरणी अशोक मस्के याच्याविरुद्ध दैठणा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.